पाठशाळेतील इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ

कै. ध . रा. पोंक्षे सेवासदन सराव पाठशाळेतील इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ बुधवार दिनांक 8 एप्रिल 2026 रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी माननीय तहसीलदार  ( पुणे जिल्हाधिकारी कार्यालय) श्री. स्वप्निल खोल्लम सर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच याप्रसंगी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी पुणे सेवासदन संस्थेचे सरचिटणीस श्री. पटवर्धन सर , सहसचिव श्रीमती शहाणे मॅडम , पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्ष तिकोने मॅडम हेही उपस्थित होते. मुख्याध्यापिका प्रा. पालवणकर यांनी प्रास्ताविकातून विद्यार्थ्यांना शुभाशीर्वाद दिले. इयत्ता चौथीचे विद्यार्थी प्रबुद्ध लंगर आणि स्वरा कुंभार यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त करताना आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला व शाळेप्रती कृतज्ञतेची भावना असल्याचे सांगितले. इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनीही प्रसंगनाटिकेच्या माध्यमातून चौथीच्या ताई-दादांना शुभेच्छा दिल्या.  
चौथीच्या विद्यार्थ्यांनी ईशस्तवन आणि आनंददायी गीत सादर केले. या दिवशी इयत्ता चौथीच्या सर्वाधिक उपस्थिती असलेल्या ६ विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले. विद्यार्थ्यांनीही शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त करत शाळेला भेट म्हणून घड्याळ दिले . शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती सोनवणे मॅडम यांनी संस्कारक्षम गोष्टीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आत्मविश्वास आणि जिद्दीचे महत्त्व पटवून दिले व उज्ज्वल  भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या . प्रमुख पाहुणे श्री. खोल्लम यांनी विद्यार्थ्यांना आई-बाबांच्या कष्टांची जाणीव ठेवा, स्वतःबरोबरच समाजाचाही विचार करा, आजच्या स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर दररोज नवनवीन गोष्टी शिका असे मौल्यवान मार्गदर्शन सोप्या शब्दांत केले.

कार्यक्रमानंतर सर्व विद्यार्थ्यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. वरील सर्व कार्यक्रमाचे नियोजन इयत्ता चौथीच्या वर्गशिक्षिका सौ. धनश्री ढुमे यांनी केले.

Scroll to Top