मराठी भाषा गौरव दिना
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पालकसभा व बालसाहित्य प्रदर्शन
कै. ध . रा. पोंक्षे सेवासदन सराव पाठशाळेत शुक्रवार दिनांक 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त बालसाहित्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले . मुख्याध्यापिका प्रा. अश्विनी पालवणकर यांनी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रदर्शनाचे उद्घाटन केले. हे प्रदर्शन पाहण्यासाठी आवर्जून इयत्ता पहिली ते चौथीच्या पालकांना आमंत्रित करण्यात आले होते . ‘ वाचन संस्कृती विद्यार्थ्यांच्या घरातही रुजली पाहिजे ‘ या विचारातून या उपक्रमाचे आयोजन दरवर्षी केले जाते . लहान मुलांच्या भावविश्वाशी निगडित अशी भरपूर रंगीबेरंगी चित्रे असलेली गोष्टींची पुस्तके, बडबडगीते , परीच्या गोष्टी, पशु,पक्षी, प्राणी, जंगल, अद्भुत कथा, रहस्य कथा इत्यादी विविध प्रकारची पुस्तके या प्रदर्शनात मांडण्यात आली होती.
हे प्रदर्शन सर्व विद्यार्थ्यांसाठी दोन दिवस ठेवण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांनी ही पुस्तके हाताळली, वाचली. त्यामुळे त्यांना मराठी भाषेच्या या खजिन्याची ओळख झाली. पालकांनाही शाळेत असलेल्या पुस्तकांबद्दल माहिती झाली. बऱ्याचशा पालकांनीही बसून ही पुस्तके वाचली आणि स्वतःच्या बालपणात जाण्याचा एक वेगळा अनुभव घेतला. इतकी पुस्तके पाहून विद्यार्थी आणि पालकही भारावून गेले. इयत्ता पहिली , दुसरीच्या विद्यार्थ्यांना पालकांनी स्वतः पुस्तके वाचून दाखवावीत जेणेकरून त्यांचा विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला जाईल. यासाठी शाळेने पालकांनाही नोंदणी करून पुस्तक घेण्याची सोय उपलब्ध करून दिली. पहिल्याच दिवशी दहा पालकांनी शिक्षकांकडे नोंदणी करून वाचण्यासाठी पुस्तके नेली.
हे प्रदर्शन आवडल्याचे सर्व पालकांनी आवर्जून सांगितले. मुख्याध्यापिका अश्विनी पालवणकर आणि शाळेतील शिक्षिका व साहित्यिक डॉ. प्रिया निघोजकर यांनी याप्रसंगी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले.







