भारतीय ज्ञान दृष्टीकोनातून समग्र प्रगती पत्रक

भारतीय ज्ञान दृष्टिकोनातून शिक्षणाकडे पाहिल्यास शिक्षणाचा व्यापक आणि समग्र दृष्टिकोन आपल्या लक्षात येईल. शिक्षणाचा समग्र दृष्टिकोन प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानात किती खोलवर रुजलेला आहे हे आपल्याला समजेल. भारतीय ज्ञान दृष्टिकोनात मनुष्य हा पंचकोशांनी तयार झालेला आहे आणि या प्रत्येक कोशाचा विकास करणे म्हणजे या प्रत्येक कोशाची क्षमता विकसित करणे होय. शिक्षणाद्वारे या क्षमता विकसित करत बालकांचे  हळूहळू संपूर्ण व्यक्तिमत्व विकसित करता येते. यामुळेच या पंचकोश विकास प्रक्रियेचा योग्य विचार करून कृती  करणे आवश्यक आहे. या पंचकोशांमध्ये अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश  विज्ञानमय कोश, आनंदमय कोश या कोशांचा समावेश आहे आणि या पंचकोशांचा विकास करण्यासाठी बालकांचा शारीरिक,बौद्धिक, भावनिक, आध्यात्मिक, नैतिक, सांस्कृतिक आणि कलात्मक, पर्यावरण जागृती या घटकांचा विकास होणे गरजेचे आहे.

पंचकोश

    • अन्नमय कोश :  स्थूल शरीर विकास म्हणजेच शरीरीक विकास
    • प्राणमय कोश : जीवनशक्ती प्राणिक विकास,प्राणऊर्जा विकास
    • मनोमय कोश : मानसिक विकास
    • विज्ञानमय कोश: विवेकबुद्धी, बौद्धिक क्षमता,बौद्धिक    विकास
    • आनंदमय कोश: आत्मिक विकास ,आध्यात्मिक विकास बालकांच्या शिक्षणाच्या समग्र विकासासाठी पायाभूत स्तरापासून व्यक्तीच्या शारीरिक, बौद्धिक ,भावनिक आणि अध्यात्मिक पैलूंच्या विकासावर लक्ष केंद्रित केलेले आहे.बालकांच्या शिक्षणाच्या समग्र प्रगतीचे प्रतिबिंब त्यांच्या समग्र प्रगतीपत्रकामध्ये खालील प्रमुख घटकांच्या आधारे प्रतिबिंबित करण्यात आले आहे.
    • शारीरिक विकास : बालकांची शारीरिक क्षमता, शारीरिक आरोग्य आणि समन्वय विकसित करण्यासाठी शारीरिक कृती, योग आणि खेळ अत्यावश्यक आहेत. याचे महत्त्व भारतीय ज्ञान दृष्टीकोनात आधीच अंतर्भूत आहे.शारीरिक विकास हा पंचकोशातील अन्नमय कोशाशी संबंधित आहे. यासाठी शरीर सुदृढ करणे, सर्व क्षमतांनी युक्त करणे , आहार, व्यायाम, खेळ, श्रम,स्वावलंबन, स्वच्छता, विश्रांती या विविध घटकांचा योग्य विकास करावा लागतो.
    • बौद्धिक विकास : भारतीय ज्ञान दृष्टीकोनात बालकांचा बौद्धिक विकास म्हणजे त्यांचे कुतूहल, चिकित्सक विचार, समस्या निराकरण, कौशल्य आणि सर्जनशीलता वाढविणे म्हणजेच विज्ञानमय कोशाचा विकास करणे.बालकांच्या सर्वसमावेशक बौद्धिक विकासाला प्रोत्साहन देणे हे अनुभवाधारीत शिक्षण आणि विविध विषयातील शोधाला प्रोत्साहन देते.विज्ञानमय  कोश म्हणजे व्यक्तीमध्ये चांगले, वाईट ,योग्य ,अयोग्य या विवेक बुद्धीचा विकास करणे. निरीक्षण, परीक्षण ,विश्लेषण, अनुमान ,निर्णय हि कौशल्ये विकसित करणे म्हणजेच तर्क बुद्धीचा व दूरदृष्टीचा विकास करणे . यासाठी तार्किक कृती करणे, प्रयोग करणे, संदर्भ लावणे या घटकांचा विकास करावा लागतो .
    • भावनिक विकास : भारतीय ज्ञान दृष्टीकोनात बालकांचा भावनिक विकास हा त्यांच्या मनोमय कोशाशी संबंधित आहे. सेवा, सहकार्य, भक्ती, शांतता, संयम, करुणा, आदर , स्व-ची जाणीव असे विविध गुण बालकांमध्ये निर्माण करणे व त्यांचे सवयीत रूपांतर करणे आवश्यक असते. यासाठी पंचज्ञानेंद्रियांद्वारे ग्रहण केलेले अनुभव मनावर परिणाम करत असतात. त्यामुळे मनावर योग्य नियंत्रण व योग्य संवेदना निर्माण होण्यासाठी मनोमय कोशाच्या विकासाची आवश्यकता असते . बालकांना त्यांच्या भावना प्रभावीपणे समजून घेण्यास  आणि त्यांचे योग्य व्यवस्थापन करण्यात प्रोत्साहन देणे आवश्यक असते . या दृष्टीने कथा, गाणी, विविध नाटके, प्रसंग निर्मिती, संवाद,चर्चा अशा घटकांचा विकास करावा लागतो.
    • आध्यात्मिक विकास : भारतीय ज्ञान दृष्टीकोनात अध्यात्मिक विकासाला महत्त्व दिले आहे. यासाठी बालकांना त्यांच्या अंतर्मनाचा शोध घेण्यास, नैतिक मूल्य विकसित करण्यास आणि सर्व प्राण्यांचे परस्पर संबंध समजून घेण्यासाठी प्रोत्साहन देणे आवश्यक आहे.हा विकास होण्यासाठी  विविध प्रकारच्या कला शिकणे, त्यांचा आस्वाद घेणे, पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. समर्पण, त्याग या भावनांचा परिपोष करणे यातून या कोशाचा अधिक विकास होतो. या दृष्टीने दृश्यकला व प्रदर्शनीय कलांचा आनंद घेणे, विविध सण-समारंभ यांचे आयोजन करणे अशा गोष्टी कराव्या लागतील.
    • नैतिक विकास : भारतीय ज्ञान दृष्टीकोनात नैतिक विकास होण्यासाठी पुढील मुल्ये महत्वाची मानली आहेत.
  1. प्रामाणिकपणा – सत्य बोलणे, फसवणूक न करणे
  2. जबाबदारीची जाणीव – स्वतःच्या कृतींची जबाबदारी स्वीकारणे
  3. आदरभाव – मोठे-लहान, शिक्षक, पालक, सहकारी यांचा आदर
  4. सहानुभूती व करुणा – इतरांच्या भावना समजून घेणे
  5. शिस्त – नियम पाळणे, वेळेचे भान
  6. सहकार्य – संघभावनेने काम करणे
  7. स्वतःवर नियंत्रण – राग, लोभ, मत्सर यावर संयम
  8. न्याय व समतेची भावना – योग्य-अयोग्य ओळखणे
  9. देशभक्ती व सामाजिक जबाबदारी
  10. पर्यावरणप्रेम – निसर्गाची काळजी घेणे

यासाठी पालक,शिक्षकांचे आदर्श वर्तन,रामायण,महाभारत,पंचतंत्र,इसापनीती यातील बोधकथा, विविध कथा, गोष्टी, आधुनिक बोधकथा सांगणे ,दैनंदिन जीवनातील उदाहरणे देणे, शाळा,घर,समाजातील विविध प्रसंगातील योग्य, अयोग्य समजावून सांगणे. समूहकार्य, नाट्य, भूमिका अभिनय , घर व शाळेत ठरावीक नियम सातत्याने पाळणे महत्वाचे ठरते.म्हणजेच बालकाच्या मनोमय कोशाचा विकास उत्तम होणे गरजेचे आहे.

  • सांस्कृतिक आणि कलात्मक विकास : भारताला समृद्ध संस्कृतीत वारसा लाभलेला आहे, जो संगीत, नृत्य, नाटक आणि सादरीकरण कला यासारख्या विविध कला प्रकारांतून प्रदर्शित होतो. या समृद्ध विविध सांस्कृतिक परंपरांचा बालकांना परिचय करून देणे म्हणजेच सांस्कृतिक आणि कलात्मक विकास होय. यासाठी प्राणमय कोश, मनोमय कोश व आनंदमय कोशाचा विकास होणे गरजेचे आहे. उत्तम हस्ताक्षर, सुंदर गाणी म्हणणे, विविध तांत्रिक कौशल्य प्राप्त करणे, श्वासावर नियंत्रण आणणे, स्थिर बसणे अशा सारख्या कृती केल्यामुळे प्राणमयकोशाचा हळूहळू विकास होतो. त्यामुळे शरीरातील विविध अंगांचा एकमेकांशी योग्य संबंध राहतो. यामुळे विविध कौशल्य प्राप्त करण्यासाठी याचा उपयोग होतो. व्यक्तीच्या शरीरात जी प्राण ऊर्जा असते तिच्याद्वारे शरीरातील सर्व क्रियांचे संचालन केले जाते म्हणूनच प्राणमय कोश विकसित करणे महत्त्वाचे व गरजेचे आहे.
  • पर्यावरणीय जागरूकता : बालकांना निसर्गाचे रक्षण करण्याचे महत्त्व पर्यावरणीय समतोल आणि पर्यावरणावर मानवी कृतींचा प्रभाव याबद्दल जागृत करणे म्हणजेच पर्यावरणीय जागरूकता होय. यासाठी भारतीय ज्ञान दृष्टिकोनातून मनोमय कोशाचा विकास होणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

           भारतीय ज्ञान दृष्टिकोन आणि समग्र प्रगतीपत्रक यांचे एकीकरण हे बालकांच्या सर्वांगीण विकासाच्या मूल्यांकनावर लक्ष केंद्रित करते. समग्र प्रगतीपत्रक हे शैक्षणिक संपादणुकीच्या पलीकडे जाऊन शारीरिक विकास ,भावनिक बुद्धिमत्ता, सर्जनशीलता, नैतिक मूल्य आणि एकंदरीत चारित्र्य विकासाचे मूल्यांकन करते.याची अधिक माहिती आपण पुढे पाहू या.

Scroll to Top