नवा संकल्प : 360° मूल्यमापन
प्रत्येक बालक एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे.सेवासदन शाळेतील शिशुशाळा व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या वर्गात डोकावल्यावर हे प्रकर्षाने जाणवले.त्यांच्या त्यांच्या वयोगटानुसार कोणी चित्र छान रंगवते,कोणी बालगीत तालासुरात म्हणते,कोणी कवितेच्या बोलानुसार हावभाव उत्तम करते,कोणी खणखणीत आवाजात वर्गात पुढे येऊन अंक न चुकता म्हणते,कोणी वर्गात शिक्षक काय सांगतात हे लक्ष देऊन ऐकते,कोणी वर्गात पडलेला कागदाचा बोळा कोपऱ्यातल्या कचरा पेटीत टाकते, कोणी वर्गात खाली पडलेला खडू लगेच उचलून शिक्षकांच्या हातात देते, कोणी मित्राची खाली पडलेली पेन्सिल, खोडरबर लगेच उचलून त्याला देते, कोणी स्वतःच्या डब्यातील खाऊ आपल्या मैत्रिणीला देते, कोणी मैत्रिणीने डब्यात आणलेला खाऊ स्वतःखाते, कोणी छोट्याशा कारणावरून लगेचच मोठ्याने रडते तर कोणी मनाविरुद्ध गोष्टी झाली म्हणून मित्र किंवा मैत्रिणीला लगेचच ढकलते किंवा शिक्षकांकडे तक्रार करते. असे एक ना अनेक कितीतरी वर्तन प्रकार वर्गात पाहायला मिळतात. खरंतर वरकरणी दिसताना हे वर्तन सर्वसाधारण आहे परंतु याच छोट्या छोट्या कृतींमध्ये त्यांच्याकडे असलेली विशेष क्षमता लपलेली असते. तीच आपल्याला ओळखायची आहे आणि ज्या बालकामध्ये जी क्षमता प्रकर्षाने जाणवते ती आपल्याला वृद्धिंगत करायची आहे, अर्थातच सकारात्मक क्षमता वृद्धिंगत करायची आहे आणि नकारात्मक क्षमता ही सकारात्मक क्षमतेकडे वळवायची आहे. पुस्तकातील अभ्यासाच्या मूल्यमापनासोबतच बालकाची प्रगती इतर छोट्या कृतींमध्येही वर्गामध्ये कशी आहे याचेही यापुढे निरीक्षण करून त्याच्याही नोंदी घेतल्या जातील,म्हणजे थोडक्यात प्रत्येक बालकाच्या विकासाचे सर्व अंगांनी निरीक्षण केल्या जाईल.सर्व अंगांनी म्हणजेच बालकाचा शारीरिक विकास, बौद्धिक विकास, भावनिक विकास, अध्यात्मिक विकास, नैतिक विकास, सांस्कृतिक व कलात्मक विकास आणि पर्यावरण जागरूकता याविषयीचा विकास कसा होतो याचे निरीक्षण करून नोंदी घेतल्या जातील. म्हणजेच प्रत्येक बालकाचे 3600 तून मूल्यमापन केल्या जाईल. हे शब्द वाचायला जरी बोजड वाटत असतील किंवा यामागील आवाका जरी मोठा असला तरी सुद्धा बालकाच्या वयोगटांनुसार त्याच्या वर्गात करून घेण्यात येणाऱ्या कृतींमधून हा विकास घडवून आणण्यात येणार आहे.राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मध्ये हीच संकल्पना बालकांच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी मांडण्यात आली आहे आणि याची सुरुवात सेवासदन शिशु शाळा आणि प्राथमिक शाळेमध्ये करण्यात आलली आहे.याविषयीची अधिक माहिती आपण पुढील भागात पाहू.
डॉ.प्राची राहुल चौधरी
सेवासदन अध्यापिका विद्यालय पुणे .
सदस्य –समग्र प्रगती पत्रक (HPC)पायाभूत स्तर (MSCERT पुणे)
